माझा स्तंभ -१


लौकिक अर्थाने गेले काही वर्ष मी जेष्ठ (काही जण मला शिष्ट देखील म्हणत असावेत) नागरिक आहे आणि उर्वरित आयुष्यात देखील राहणार आहे. साहजिकच माझे सर्व सहकारी, मित्रमैत्रिणी वगैरे माझ्याच वयाचे आहेत. माझा बहुतेक वाचक वर्ग हा चाळीशी पुढचाच आहे.

या वर्गाने स्वत:च्या आयुष्यात जेव्हढी स्थित्यंतरे पाहिली तेव्हढी कुणीही पहिली नसतील. प्रत्यक्ष स्थित्यंतरापेक्षा देखील त्याचा वेग हा खूपच जास्त होता. आपल्या आधीची पिढी या वेगाला सामोरे जाऊ शकली नाही. आजही या पिढीतील लोकं या बदलांमध्ये हरवून जातात. आता हेच पहा ना. बऱ्याच जणांना मोबाईल वापरणे अवघड जाते. मनीऑर्डर पाठवणाऱ्या या लोकांना डिजिटली पैसे कसे पाठवले जातात हे कळत नाही. पगार खात्यात जमा होतो पण नक्की पैसे मिळतात का याची यांना खात्री नसते. परदेशी नातवंडांचा व्हिडीओ पाहतात पण हा कसा पाहता येतो ते माहित नसते.

विसाव्या शतकात आधी औद्योगिक क्रांती झाली. मग हरित क्रांती झाली. नंतर इलेक्ट्रॉनिक युग आले. संगणक आले. मग डिजिटल क्रांती झाली. जैविक युगाचा पाया रचला गेला. आता कृत्रिम बुद्धिमत्ता येत आहे. जुन्या पिढीतील लोकांना या सर्व गोष्टी बऱ्याच प्रमाणात अनाकलनीय आहेत.

आपणा सर्वांचे शालेय शिक्षण ७० च्या दशकात संपले. त्या सुमारास सर्वच लोकांवर जातीधर्माचा पगडा होता. बहुतेक सर्व पापभीरू, देव मानणारे होते. त्यामुळे शालेय शिक्षणात याचं प्रतिबिंब दिसले तर नवल नाही. पण जगात ज्या वेगाने विज्ञानाचा प्रसार होत होता त्याचा शालेय शिक्षणात अभाव होता. माझ्या माहितीनुसार आमच्या अकरावीतल्या वर्गमित्रांपैकी २५ टक्के जणांनी देखील महाविद्यालयात विज्ञान शाखा निवडली नव्हती. विज्ञान आणि गणित हे विषय त्या दृष्टीने कधी शिकवले गेलेच नाहीत. साहजिकच पुढील आयुष्यात हे विषय अडगळीच्या खोलीतच टाकले गेले. याचा परिणाम आजही दिसून येतो.

चंद्रयान आणि आदित्य L1 च्या अनुषंगाने सामाजिक माध्यमांमध्ये पोस्ट्स चा वर्षाव झाला. सर्व शास्त्रज्ञांचे गोडवे गाईले गेले. महिला शास्त्रज्ञांची, त्यांच्या साड्यांची चर्चा झाली. मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला. पण किती लोकांनी या मागचे विज्ञान जाणण्याचा प्रयत्न केला? हर हर महादेव आणि भारत माता की जय वगैरे घोषणा ठीक आहेत. पण पुढे काय?

जन्माष्टमीच्या दिवशी अनेक लोकांनी सामाजिक माध्यमांवर अनेक मेसेज पोस्ट केले, सर्वांना अनेक लाईक्स आणि थम्स अप आले. मी डॉ. सोमनाथ, इस्रोचे अध्यक्ष, यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात या शतकात पुढे काय होऊ शकते याचा विज्ञानाच्या अनुरोधाने उहापोह केला आहे. पण आमच्या ग्रुप मधील एकाही सभासदाने ऐकण्याची तसदी घेतली नाही किंवा एखादी सुचना केली नाही.


मला वाटते की साठी बुद्धी नाठी म्हणतात तेच खरे! साठीनंतर आपली आयुष्याची इतिकर्तव्यता संपली आणि आता नेत्र पैलतीरी जडले हेच मानणारे लोकं आपल्या शिक्षणाने तयार झालेत!

पश्चिमी देशात इतर कितीही वाईट चालीरीती असतील पण तिथे प्रत्येक आयुष्याला अतिशय महत्व दिले जाते. काही झाले तरी जीव वाचवणे महत्वाचे असते. आपल्या इथे म्हणजे जीव गेला तरी चालेल पण देव महत्वाचा! दहीहंडी फोडताना पडून मरणाऱ्याला स्वर्ग प्राप्ती झाली असे मानणारे लोकच समाजात जास्ती आहेत. धन्य ते राजकारणी, धन्य ते गोविंदा आणि धन्य आपण सर्व !

मला हे देखील माहित आहे की हे सर्व लिहून काही उपयोग नाही. लोकं आपली कर्म(कांडे) करताच राहणार! या जन्मरहाटीतून सुटकेसाठी याच जन्मी प्रयत्न करत राहणार. भले मग तो भाजीवाला आपल्यापेक्षा जलद हिशोब करुदे!

तथास्तु, यापेक्षा काय म्हणू?????

तळटीप: मी नेहमी इंग्रजीत स्तंभलेखन करतो अशी तक्रार होती. म्हणून यावेळी मराठीत प्रयत्न केला आहे.

Comments

वाह वाह छान लेख!

By : Bhalchandra Shrikhande
09/09/2023 11 : 03 : 55 AM

Right

By : Mona
09/09/2023 11 : 27 : 25 AM

तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की नवीन काही शिकेपर्यंत त्याच्या पुढचं version येतं आणि मग आपोआपच तोंडातून येतं 'अरे देवा '. मग मुलं,नातवंडांची मदत घ्यावी लागते आणि किती सोप्पंय, तुला कसं कळत नाही असं सुद्धा ऐकून घ्यावं लागतं काय करणार कालाय तस्मै नमः बाकी गोष्टी मात्र मागील पानावरून पुढे चालू अशी अवस्था आहे.दहीहंडीवेळीचे जायबंदी,गणपतीत धांगडधिंगा इ.इ.

By : Pratibha Tarabadkar
09/09/2023 12 : 37 : 02 PM

गणित आणि विज्ञान या विषयांचा बागुलबुवा उभा केला आणि सारेजण नको रे बाबा म्हणत लांब पळत असत हे मात्र खरे.

By : Pratibha Tarabadkar
09/09/2023 12 : 39 : 27 PM

शाळा कॅालेजमधे असताना नवरात्रोत्सव गणेशोत्सव रंगपंचमी दहीहंडी वगैरे सगळ्या सणातून माझा सहभाग होता. त्यातला आनंद मी पुरेपूर अनुभवलाय. आज तो आनंद घेता येत नाही याचा मला विषाद आहे. शेवटी आपण जगतो आनंदासाठी. आपण जर २०० वर्षांचा जगाचा ईतीहास बघितला तर लक्षात येईल की पाश्चांत देशांनी जगात जेव्हडी युध्द केली आहेत आणी जुलुम केले आहेत . जीव घेतले आहेत. त्यंच कोडकौतुक बंद करायला हव. आपलीच संपत्ती लुटुन मजा करत आहेत.

By : Hemant
10/09/2023 10 : 52 : 34 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article