माझा स्तंभ-२
नमस्कार, मी तुमचा सर्वांचा लाडका गणपती. काल आणि आज तुम्ही मला मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत आपापल्या घरी घेऊन आला आहात. तुमचे हे प्रेम पाहून मला अगदी भरून आलंय. तुम्ही सर्व पुढचे दहा दिवस तुम्ही आपले काम बाजूला ठेवून माझे आगत स्वागत करणार आहात हे पाहून एका अर्थी मला बरेच वाटले, पण खरच याची काही गरज नाहीये. कारण प्रत्यक्ष जरी नसलो तरी मी कायम तुमच्या मनात असतो हे मला पक्के ठाऊक आहे. तेव्हा मला घरी ठेवून तुम्ही आपापली कामे करत राहिलात तर मला जास्ती आनंद होईल. पण तुम्ही माझे ऐकणार नाही हे देखील तितकेच खरे आहे.
तुमचे एक वेळ ठीक आहे, पण ही सार्वजनिक गणपती मंडळे म्हणजे औरच आहेत. किती मोठ्या मूर्ती बनवता तुम्ही! म्हणजे मी एव्हढा छान दिसतो वगैरे ठीक आहे, पण मला मंडपात आणेपर्यंत किती त्रास, आणणाऱ्यांना पण, माझ्या भक्तांना पण आणि मुख्य म्हणजे इतर नागरिकांना देखील! लोकांना कामे असतात पण तुम्ही तासनतास सर्व रस्ते आडवून ठेवता. रुग्णवाहिकांना पण रुग्णालयात वेळेवर पोहोचता येत नाही त्यामुळे! आणि केव्हढा आवाज हा! एखादा मेलेला माणूस देखील जागा होईल! ढोल ताशे वगैरे पारंपारिक वाद्ये ठीक आहेत, पण डीजे? बरं त्या मंडपांवर पण भोंगे लावलेत कर्णकर्कश्य त्याचे काय! दर शुक्रवारी मशीदीवर वाजतात म्हणून तुम्हीही वाजवणार दहा दिवस? मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला?
आणि किती उंच मूर्ती बनवता? मला तर वाटत होते की प्रत्येक उड्डाण पुलाला माझे डोके नक्की आपटणार! आणि रस्त्यावर खड्डे किती. सारखे मला मी आता पडणार असेच वाट्त होते. मला खड्यांचा त्रास दोनदाच होतो पण तुम्हाला तर वर्षानुवर्ष हा त्रास आहे. त्या कंत्राटदारांना दोन पैसे जास्ती द्या टेबलाखालून पण निदान खड्डे कायमचे बुजवा एकदाचे! पण काय करणार, सर्वांनाच दरवर्षी भूक लागते ना!
भूकेवरून आठवण झाली, उकडीचे २१ मोदक आहेतना तयार. आणि लाल फुले. काल माझी एक भक्त तक्रार करत होती की माळ्याने सर्व जास्वंदीच्या झाडाच्या फांद्याच कापून टाकल्या म्हणे! त्यामुळे आज लाल फुलेच नाहीयेत. हे माळीबुवा काम काहीच करत नाहीत म्हणे! फक्त मोबाईल वर व्हिडिओ बघत असतात! बाजारात फुले किती महाग झाली आहेत!
माझ्या आईने मला मातीपासून बनवले म्हणून तुम्ही पण आधी मातीच्या मूर्ती बनवत होता. पण आता पीओपी वापरता. अरे किती नुकसान कराल पर्यावरणाचे?
ही मिरवणूक काही संपत नाहीये. मला तर दमायला झालंय. अरे, तो ब्रिज सांभाळा, डोके आपटेल माझे! कधी एकदा घरी जाऊन मोदक खातोय असे झालंय. पण अजून एक दोन तास काही होईल असे वाटत नाही. परत गेल्यावर तुम्ही शंभर आरत्या म्हणणार, पूजा करणार, म्हणजे काही खरं नाही. आलिया भोगासी असावे सादर!
आता दहा दिवसांची निश्चिंती आहे, पण शांतता नाही. भक्त येणार, अनेक तास लाईन मध्ये घालवणार. माझे, फोटो, व्हिडिओ काढणार. सेल्फी घेणार. रात्री नाचण्यात घालवणार. आणि गाणी कोणती, तर बाई जरा जपून दांडा धरं! एकूणच सगळे कठीण आहे.
जाउदे झालं, पोहोचेपर्यंत जरा एक वामकुक्षी घेण्याचा प्रयत्न करतो. भेटूया आता रोजच पुढचे दहा दिवस.



Comments
Wah chan👌
By : Mohini
दरवर्षी तेच ते आणि तेच ते.काही फरक पडणार नाही आपण कितीही कंठशोष केला तरी.लोकांना कळून चुकलंय,हा सण म्हणजे दहा दिवसांत वर्षभराची कमाई...
By : Pratibha Tarabadkar
Nice write !!!
By : Aniruddha Patwardhan
wah👌👌
By : Kanchan Vipat