हसबंड हेल्प्मेट


“साब, ये कोई आशुतोष करके है, आपसे मिलना चाहता है. कोई सेल्समन है. भेज दू क्या उपर?”, खालून वॅाचमनचा फोन होता. मी आणि गौरी सकाळी अकरा वाजता चहा पीत बसलेलो होतो. शनिवार असल्यामुळे दोघांनाही सुट्टी होती. मुले कॅालेजला गेलेली असल्याने घर शांत होतं.

“हा भेज दो.”

दोन मिनिटांनी दारावरची बेल वाजली. मी उठून दरवाजा उघडला. समोर एक तरुण उभा होता. साधारण पंचविशीच्या आसपास असावा.
“नमस्कार. मी आशुतोष. आत येऊ का?”
“या, बसा. काय विकता तुम्ही? सामान तर काही दिसत नाहीये तुमच्याकडे.” गौरी म्हणाली.
उत्तरादाखल त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला.

“मोबाईल? अहो आमच्याकडे प्रत्येकीकडे दोन दोन आहेत. आणखी नको आता.”
“मी मोबाईल नाही, मोबाईल अॅप विकतो.”
“ गेमस् तर अजिबात नको. आमची मुले आता त्या वयाच्या पलिकडे गेली आहेत.”
“प्रथम मी काय सांगतो ते ऐकून तर घ्या. घ्यायचे की नाही तो तुमचा चॅाईस आहे.”
“बरं बोला.” मी म्हणालो.
“आम्ही एक अॅप विकसित केले आहे. त्याचे नाव आहे एचएचएम, म्हणजे हसबंड हेल्प मेट.” हे ऐकून गौरी एकदम उत्तेजित झाली.
“ हे ॲप दोन भागात आहे. मास्टर आणि स्लेव्ह. मास्टर ॲप तुमच्या मिसेसच्या फोनमधे इंस्टॅाल होईल, तर स्लेव्ह मिस्टरांच्या फोनमधे.”
“ते म्हणा बरोबरच आहे. आम्ही नाहीतरी गुलामच आहोत बायकोचे!” मी म्हणालो.
“जग्गू,” माझे नाव खरतरं जगन्नाथ आहे. पण आम्ही नावाचेच जगन्नाथ! “ऐक जरा ते काय म्हणताहेत ते.”
“हे ॲप वापरले तर तुम्हाला तुमच्या पत्नीला कधीही काहीही विचारायचा गरज पडणार नाही. याचे पूर्ण सेटिंग मास्टर ॲप मधून होते.”
“सहाजिकच आहे.” मी.
“मला तुमचे फोन द्या. आपण ॲप लोड करुया, म्हणजे नीट समजेल तुम्हाला.”

पाच मिनिटांमधे आशुतोषने ॲप लोड केले.
“आता पहा. आपण याचे सेटिंग करुया. मास्टरमधे ॲप उघडले की मेनू ओपन होतो. ही पहिली ऑप्शनआहे, अलार्म. मिस्टरांना सकाळी उठविण्याची वेळ तुम्ही ठरवू शकता.”
“बापरे, इथपासून सुरवात आहे?” मी.
“त्यानंतर पाच मिनिटांनी चहा तयार आहे असा मेसेज स्लेव्हला जातो. पंधरा मिनिटांनी दाढी, अंघोळ करुन घ्या अशी रिक्वेस्ट जाते.”
“रिक्वेस्ट की आज्ञा?”
“जग्गू, थांबरे जरा.” गौरी.
“नंतर नाश्ता तयार आहे, टिफिन रेडी आहे वगैरे वगैरे. आता तुम्हाला साधारण कल्पना आली असेल.”
“किती छान आहे हे. मला खूप मदत होईल.” गौरी.
“यानंतर यात ऑफिस मोड आहे, लंच अलार्म, टी टाईम वगैरे. सहा नंतर ऑफिस मधून येताना करण्याची कामांची यादी फ्लॅश होत रहाते. ही सर्व बेसिक फंक्शन्स आहेत. नंतर यात ॲडव्हान्स मोड पण आहेत. आता समजा तुम्ही बाहेर जाणार आहात पण मिस्टरांसाठी तुम्ही स्वयंपाक करून ठेवला आहे. तुम्ही ॲपमधे कुठे काय ठेवलंय ते एंटर करुन ठेवायचं. म्हणजे, हिरव्या कॅसेरॅाल मधे भाजी, निळ्या कॅसेरॅालमधे आमटी वगैरे वगैरे. म्हणजे मिस्टरांना काही तुम्हाला विचारायचा गरजच नाही. कुणी पाहुणे येणार असतील तर रिमाईंडर ठेवू शकता.”
“म्हणजे माझ्या आयुष्यावर संपूर्ण ताबा हिच्या हातात जाणार तर. तसा तो आत्तादेखील आहेच म्हणा!.” मी म्हणालो.

“यात काही हिडन फीचर्सपण आहेत. समजा मिस्टरांनी ॲप बंद केले तर लगेच तुम्हाला मेसेज जाईल. मग तुम्ही ॲलर्ट की दाबली तर मिस्टरांच्या फोनवर अलार्म वाजेल.”
“हे खूपच मस्त आहे.” गौरी उद्गारली.
“यात स्लेव्ह ॲपमधे काही फीचर्स नाहीयेत का?” मी वैतागून विचारले.

“आहेत ना.” आशुतोष म्हणाला. “चहा, नाश्त्याला उशीर झाला तर तुम्ही रिमाईंडर बटण दाबू शकता. कॅामेंट मधे भाजीत मीठ कमी होते वगैरे लिहू शकता. कधी घरी जायला उशीर होणार असेल तर कळवू शकता. रात्रीचा मेनू सजेस्ट करू शकता. येताना एखादा पाहुणा बरोबर असेल तर आगाऊ निरोप पाठवू शकता.”

“ही ॲप्स मी तुमच्या फोनमधे इंस्टॉल केली आहेत. तुम्ही महिनाभर फ्री वापरून पहा. पसंत पडली तर चालू ठेवा.”

“पण याची किंमत किती आहे?”
“आम्ही दर महा एक हजार रुपये घेतो पण तुम्हाला फक्त तीनशे पन्नास रुपये भरावे लागतील. जीएसटी वेगळा भरावा लागेल. जसजसे नवीन फीचर्स उपलब्ध होतील ते तुम्हाला विनाशुल्क मिळतील. ते अॅाटोमॅटिकली अपडेट होत राहतील. शिवाय जर आमचे ॲप तुम्ही कुणाला रेफर केलेत तर दहा टक्के कॅशबॅक मिळेल. जसे तुमचे रेफरल्स वाढतील तसा कॅशबॅकदेखील वाढेल.”

हे ॲप घेण्याबध्दल मी जरी साशंक होतो तरी गौरी ठाम होती.
सध्या आमच्याकडे गेले तीन महिने हे ॲप आम्ही वापरत आहोत. यात कुठल्या वेळेला नवरा कुठे आहे त्याचे लोकेशन मास्टर ॲपवर दिसेल हे नवीन फीचर आले आहे.

जर आपणापैकी कुणाला हे ॲप हवे असेल तर आम्हाला कळवा. दुसऱ्या दिवशी आशुतोष तुमच्या घरी हजर होईल. आता तर फक्त फोनवर बोलून तुम्ही ॲप विकत घेऊ शकता. सर्व काही ऑनलाईन झाले आहे.

Comments

अरे बापरे! हे सगळं असं झालं तर समस्त नवर्‍यां ना संन्यास घेऊन हिमालयात जावं लागेल!

By : Bhalchandra Shrikhande
13/12/2023 9 : 55 : 13 PM

म्हणजे नवरा बायको मध्ये जे थोडे फार conversation होते ते पण बंद 🤦😃

By : Sheela Bahadkar
14/12/2023 09 : 02 : 23 AM

Conversation goes digital. You can talk even if he is Timbaktu!!!

By : Admin
14/12/2023 10 : 38 : 21 AM

It is just a reminder.Otherwise the wife has all her house hold duties as usual.

By : Pratibha Tarabadkar
14/12/2023 9 : 06 : 25 PM

Very nice idea, I may develop this app

By : Devendra Buddhikot
15/12/2023 8 : 01 : 18 PM

या कथेचं नाव husband hell met असंही ठेवता येईल 😀

By : Devendra Buddhikot
15/12/2023 8 : 03 : 58 PM

HaHaHa

By : Admin
16/12/2023 09 : 29 : 29 AM

भन्नाट कल्पना

By : हेमांगी कुलकर्णी
16/12/2023 7 : 08 : 14 PM

कल्पनाविलास मस्त

By : Dr Sheetal
17/12/2023 4 : 25 : 02 PM

मस्त 👌👌😁😁

By : SHEETAL SURESH KHIRE
30/12/2023 3 : 14 : 55 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article