रहिवासी संस्था (LIR- Live-in relationship)


रहिवासी संस्था (LIR- Live-in relationship)

शशांक पुरंदरे

सुयोग आणि आशा त्यांच्या नवीन कार्यालयात बरोबर १०.४५ ला दाखल झाले. त्यांच्या या नवीन उपक्रमाचा पहिलाच दिवस होता. दोन दिवसांपासून त्याच्या जाहिराती यू ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे माध्यमांवर झळकत होत्या. त्यांच्या कार्यालयाचा पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक त्यात नमूद केलेले होते. भेटण्याची अथवा फोन करण्याची वेळ ११ ते १ आणि ४ ते ८ अशी दिलेली होती. दोघेही स्थानपन्न होईपर्यंत सुयोगचा फोन किणकिणला. हसून आशाला थम्सअप देत सुयोगने फोन उचलला.

“नमस्कार. रहिवासी संस्था. मी सुयोग बोलतोय.”
“मी आप्पा दानवे बोलतोय. मला दोन बीएचके फ्लॅट हवाय. तुमचा हा प्रोजेक्ट कुठे आहे?”
“माफ करा. आपला काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही घरं विकत नाही. ज्यांना लग्न न करता एकत्र राहण्याची इच्छा आहे अशा लोकांना आम्ही मदत करतो.”
“पण माझेतर लग्न झालंय. मी साठ वर्षांचा आहे आणि मला चार मुले देखील आहेत. आता स्टेपनी-.”
“दुर्दैव तुमचे!” असे म्हणून सुयोगने फोन कट केला.

हे सर्व ऐकून आशा खोखो हसत होती.
“हसतेस काय?” सुयोग वैतागून म्हणाला.
“हसू नको तर काय करू?” कसेबसे हसू आवरून आशा म्हणाली. “सुरुवात तर मस्त झाली.” असे म्हणून आशाला परत हसू फुटले. तितक्यात आशाचा फोन वाजला.

“नमस्कार. रहिवासी संस्था. मी आशा बोलतेय.”
“आशाताई, मी किनई रिया बोलतेय.” पलिकडून एका लहान मुलीचा आवाज आला. “तुम्ही न रील खूप छान बनवलंय. मला शिकवाल का?” आशाने काही न बोलता फोन कट केला. आता हसायची पाळी सुयोगची होती.

आत किचनेट मधे जाऊन सुयोगने कॅाफी केली. दोन घोट घेतल्यावर दोघांनाही बरे वाटले.

“सुयोग, आपण ॲानलाईन जाऊन काहीच चेक केलं नाहीये.” आशाने लॅपटॅाप उघडला.
“हे काय, चार जणांनी विचारणा केली आहे. एक २४ वर्षांचा मुलगा आहे, पण सध्या मैत्रीण नाही. त्याला हजार रुपये भरुन नाव नोंदवायला सांगते. एक जोडपे आहे, त्यांना समुपदेशनासाठी चार वाजता बोलावूया. आपण आपली फी तर टाकलीच आहे संकेत स्थळावर. अजुनही तीनचार मेसेजेस आहेत. नॅाट बॅड, ना?”
“हो, आता ग्राहकांची वाट पहात बसूया. मला वाटते आपण आपल्या संस्थेचे नाव बदलून बिनलग्न रहिवासी संस्था असे ठेवू या.”
“सध्या राहूदे, मग बघू पुढे.” आशाने विषयच संपवला.

पाच मिनिटांनी दरवाजावर टकटक झाले आणि एक जोडपे आत आले. दोघेही साधारण पंचविशीतले वाटत होते.

“नमस्कार मी अमेय आणि ही मैत्रेयी. आम्हाला LI-R बद्दल माहिती हवी आहे.”
“या, बसा, मला वाटते की तुम्ही दोघांनी ॲानलाईन फॅार्म भरले आहेत. “सुयोगने त्याचा लॅपटॅाप उघडला.
“नाव, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, वैद्यकीय माहिती वगैरे सर्वकाही आहे यात. तुम्हाला काय हवंय नक्की?”
“आम्ही लिव्ह इन मधे राहण्याचा विचार करतोय. पण आम्हाला कोणी भाड्याने घर द्यायला तयार नाही.”
“हा प्रॅाब्लेम बऱ्याच लोकांना येतो.
महाराष्ट्रात लिव्ह इन मुद्रांकित करण्याची गरज नाही. पण तुम्ही दोघं एक ॲफिडेव्हिट करु शकता. त्याने मदत होईल. पण तुम्ही लग्न का करत नाही?” सुयोगने विचारले.
“आमची सहा महिन्याचीच ओळख आहे. लग्नाआधी एकमेकांना जाणून घेणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. पुढे जाऊन लग्नाचा विचार करता येईल.”

सुयोगने मान डोलावली. दोघे निघून गेल्यावर परत सर्व शांत झाले.
नंतर आशाचा फोन वाजला.

“मी अजय जोशी. मला लिव्ह इन मधे रहायची इच्छा आहे.”
“मग?”
“मैत्रीणच मिळत नाही. तुम्ही काही करु शकता का?”
“पण माझं तर लग्न झालंय. तुम्हाला दुसरी कुणीतरी शोधावी लागेल.” आशा मिश्किलपणे म्हणाली.
“अहो तसं नाही. मॅरेज ब्यूरो सारखं तुम्ही जोड्या जमवत नाही का? माझं नाव रजिस्टर करुन ठेवा.”
“आम्ही हा विचारच केला नव्हता. कल्पना छान आहे. तुमचं नाव नोंदवून ठेवा.”

दोघांचेही फोन स्पीकरवर असल्यामुळे सुयोग हे सर्व संभाषण ऐकत होता.
“हे करायचे असेल तर आपली जाहिरात बदलावी लागेल. शुभस्य शीघ्रम!” असे म्हणून सुयोग लगेच कामाला लागला.

दहा मिनिटे फक्त सुयोगच्या लॅपटॅापवर टायपिंगचा आवाज येत होता. परत दरवाजावर टकटक झाले आणि आणखी एक कपल आत आले.

“मी केदार आणि ही शीला. आम्ही गेले दोन वर्ष लिव्ह इन मधे रहात आहोत. सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण माझे आईवडील आमच्या घरी रहायला आले आणि आमचे भांडण झाले.”
“कारण याच्या आईवडीलाची मी सेवा करावी अशी याची इच्छा आहे. मी आयटी मधे नोकरी करते त्यामुळे मला ते शक्य नाही.”
“तुम्ही आत्ता कुठे राहता?” आशाने विचारले.
“आम्ही दोघांनी मिळून घर विकत घेतले आहे पन्नास टक्के भागीदारीत!” केदार म्हणाला. “आम्हाला बाकी काही समस्या नाही. “ शीलाने पुस्ती केली.
“तुम्हा दोघांची आर्थिक स्थिती कशी आहे?”
“पैसा भरपूर आहे.”
“मग एक काम करा. तुमच्याच आजुबाजूला अजून एक घर भाड्याने घ्या. केदारचे आईवडील तसे स्वतंत्र असतील तर एकटे राहू शकतील आणि अडीअडचणीला तुम्ही जवळच असाल. यामुळे सर्वच समस्या सुटतील.”
“थॅंक्स. हे आमच्या लक्षातच आले नाही.” केदार आणि आशा एकदमच म्हणाले.

चार वाजता जे जोडपं भेटायला आले त्यांची समस्या वेगळीच होती. ते दोघे चार वर्ष लिव्ह इन मधे रहात होते पण आता मानसीने नीट क्लीयर केली होती आणि तिला मेडिकलला ॲडमिशन मिळाली होती त्यामुळे पुढील निदान सहा वर्ष तरी दोघे एकत्र राहू शकत नव्हते म्हणून सौरभ वैतागला होता. तो जॅाब करत होता. बऱ्याच वेळ चर्चा करूनही काही उपाय सापडला नाही. शेवटी सुट्यांमधे जमेल तसे भेटत रहाणे एव्हढा एकच पर्याय शेवटी दोघांनाही मान्य करावा लागला.

नंतर अशोक आणि मीना आले ते तर सरळसरळ भांडतच होते. भांडण ‘नीट’परीक्षेवरुनच होते. पेपरफुटी नंतरच्या परत झालेल्या नीट परीक्षेत दोघांनीही नीट पेपर लिहिल्यामुळे दोघांच्याही चांगल्या रॅंक्स आल्या होत्या, तरीही अशोकला विद्यार्थी आंदोलनात जायचे होते तर मीना त्याला अजिबात सोडायला तयार नव्हती. शेवटी सुयोग आणि आशानी करीयर कशी जास्त महत्वाची आहे हे समजून सांगितल्यावर अशोकने नमते घेतले आणि दोघेही हातात हात घालून आनंदाने बाहेर पडले.

“शेवटी कसं आहे,” सुयोग म्हणाला, “पेपर फुटणे चूकच आहे पण जे विद्यार्थी नीट अभ्यास करुन परीक्षा देतात त्यांना चांगले मार्क्स मिळतातच. आणि सरकारने चूक मान्य करुन परत परीक्षा पण घेतली. त्यानंतर परीक्षा पध्दतीत सुधारणा पण केल्या. मग केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलनं करण्यात काहीच अर्थ नाही. मुळात जे आंदोलन करत होते त्यांचा नीट परीक्षेशी काहीच संबंध नव्हता.”

“हो ना,” आशा म्हणाली, “जेन झी वास्तवाशी पूर्ण डिटॅचड आहे. सामाजिक माध्यमांवरुन यांचे ब्रेनवॅाशिंग चालू आहे आणि हे सर्व त्याला बळी पडत आहेत. जाऊदे, आपण आपली बिनलग्न रहिवासी संस्था चालवून समाजकार्य करुया झाले! हे काय, पुढचे क्लायंट आलेच आहेत!”

तळटीपः हल्ली लिव्ह इन रिलेशनशिप खूपच फैलावली आहे. बहुसंख्य समाजाला मान्य नसली तरी हे वाढतच जाणार आहे. या व्यवस्थेचे फायदे आणि तोटे आहेत. शेवटी योग्य निष्कर्ष काढणे हे आपल्या सर्वांच्या हाती आहे.

Comments

आयडियेची कल्पना भारी.

By : Hemangi Pradeep Kulkarni
08/08/2026 11 : 13 : 38 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article