नात्यांची गोष्ट: भाग १२: कालिंदी


संध्याकाळचे सात वाजून गेले होते. मी हॉलमध्ये ‘वर्क फ्रॉम हॅाल’करत बसलो होतो. विन्या आणि निशू बाहेर गेले होते. आदितीच्या स्टुडिओमध्ये पार्टी होती त्यामुळे ती घरी नव्हती. ह्यांच्या स्टुडिओत कायम पार्ट्या चालू असतात, कामं कधी करतात काय माहित! त्यामुळे मी आणि कालिंदी, आम्ही दोघेच घरी होतो.

“डॅड, मला तुमच्याशी जरा बोलायचे आहे.” कालिंदी तिच्या रूममधून बाहेर येऊन मला म्हणाली.

कालिंदी दोन वर्षांपूर्वीच सीए होऊन जॉब करत होती. हळूहळू तिच्या पर्सनॅलिटित होत असलेला बदल आम्हा सर्वांनाच जाणवत होता. अलीकडे तिचं वागण थोडसं रिझर्वड् झाले होते. बोलण्यातला मराठीपणा पण खूप कमी झाला होता. पण गेले काही दिवस तर खूप अस्वस्थ वाटत होती. तिला काहीही प्रॉब्लेम असेल तर कालिंदी मलाच सांगणार हे तर ठरलेलच आहे. जय मल्होत्रा हा एकमेव अपवाद होता त्या बाबतीत. म्हणजे तो बहुतेक प्रॉब्लेम कॅटेगरीमधे नसावा.

“जनरली मुली वडिलांकडे आणि मुले आईकडे जास्त मोकळेपणी का बोलतात हे मला न सुटलेले कोडे आहे.” मी आदितीला एकदा म्हटलं.
“ओएडिपस कॅाम्प्लेक्स.” अदिती म्हणाली.
“म्हणजे काय?”
“सांगते. ओएडिपस हे ग्रीक मायथॅालॅाजी मधील एक कॅरॅक्टर आहे. त्याने वडिलांचा खून करून नंतर आईशी लग्न केले अशी आख्याईका आहे. त्यावरून हा शब्दप्रयोग निर्माण झाला. साधारण तीन ते चार वर्षांच्या मुलांना सेक्स बद्धल जाणीव होऊ लागते. विरुद्ध सेक्सचे आकर्षण असणे हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे सहाजिकच मुलगा आईकडे आणि मुलगी वडिलांकडे आकर्षिली जाते आणि त्याचमुळे मुलाला वडिलांबद्धल आणि मुलीला आईबद्धल असूया निर्माण होते. मुलाला वडील आपले प्रतिस्पर्धी वाटू लागतात. आई फक्त त्यालाच हवी असते. याच्या पुढची पायरी म्हणजे जेव्हा मुलाला समजते की आपल्याला पेनिस आहे पण मुलींना नाहीये. त्याला असे वाटते की वडिलांनीच हे कॅस्ट्रेशन केले आहे आणि ते आपलेपण करतील. मुलींच्या मनातही असेच काहीसे विचार असतात.”
“अरे बापरे? मग याला सोल्युशन काय?”
“काही नाही, वय जसं वाढत जातं तसं आपोआप मुलांना सर्व समजायला लागतं आणि सर्व काही व्यवस्थित होतं. पण म्हणूनच कदाचित मुलीला वडील आणि मुलाला आई जास्ती जवळची वाटते.”

“बोल, काय झालंय?”, मी वर्तमानात येऊन कालिंदीला विचारले, “ओह माय गॅाड! डोंट टेल मी यू आर प्रेग्नंट!”
“डॅड, डोंट बी स्टुपिड!” कालिंदी वैतागून म्हणाली, “मला तेव्हढी प्रिकॅाशन घेण्याएव्हढी अक्कल आहे.”
“नशीब माझं!”. मी म्हणालो, “ नही तो आज खानदानकी इज्जत मिट्टीमें मिल जाती थी!”
“डॅड, हे एकविसावे शतक आहे. आम्ही आज लाईफ एन्जॅाय करतो. उद्याचं कोणी पाहिलं आहे?” कालिंदी म्हणाली.

परवाच गांधी जयंतीच्या निमित्ताने मी पेपरमध्ये गांधीजींचे विचार वाचत होतो. त्यांच्या मते सेक्सचा हेतू फक्त मुलांना जन्म देण्यापुरता मर्यादित आहे. या आजच्या मुलांचे विचार ऐकून गांधीजी नक्कीच धन्य झाले असते. अर्थात मी देखील या बाबतीत गांधीजींच्या विचाराशी सहमत नाही ही वेगळी गोष्ट झाली.

हल्लीच्या पिढीचं काही खरं नाही. एकतर आईवडिलांना मित्रासारखं ट्रीट करतात. वेडा, बावळट, स्टुपिड वगैरे म्हणायला काहीही वाटत नाही यांना!
विन्या आणि कालिंदी लहान होते तेव्हाची गोष्ट आहे. मी एकदा ऑफिस मधून लवकर घरी आलो. इंडिया-ऑस्ट्रेलिया वन डे मॅच चालू होती. मी मॅच पहाण्यासाठी टीव्ही चालू केला, म्हणजे चालू करायचा प्रयत्न केला. काही केल्या टीव्ही चालू होईना. रिमोटची सर्व बटणं दाबून झाली, बॅटरी पण बदलून पाहिली पण टीव्ही चालू होईल तर शपथ. तेव्हढ्यात कालिंदी घरी आली. मी तिला म्हटलं,

“हा टीव्ही का चालू होत नाहीये? सकाळी तर चालू होता.”
“डॅड, तू पण मॅड आहेस. अरे तो पेरंटल कंट्रोल मध्ये आहे. पासवर्ड टाकला की चालू होईल” कालिंदी म्हणाली.
“हे उद्योग कोणी केले?” मी जरा उचकलोच.
“अरे, मी दुपारी ट्राय करत होते. तो चुकून तसाच राहिला. मुलांनी आईवडीलांच्या परवानगी शिवाय टीव्ही पाहू नये म्हणून ही सोय असते.” आता पर्यंत दाबून ठेवलेले हसू काही कालिंदीला आवरता आले नाही आणि ती खोखो हसत सुटली. या बयेने पेरंटल कंट्रोलने बापालाच लॉक केले होते.
“बरं पासवर्ड काय ते तरी सांग!”
“बाबा, एकदम सोपा आहे. पासवर्ड आहे ’बाबा’.” असे म्हणून कालिंदी परत हसायला लागली.

अर्थात मनोमनी मुलांच्या मनात आदरभावना तेव्हढीच असते हे मान्य करावंच लागेल. पब्लिकली मान्य करणार नाहीत कदाचित, पण आईवडील ही त्यांची रोल मॅाडेल्स असतात.

“मग, काय प्रॉब्लेम आहे?” मी परत भूतकाळातून वर्तमानात आलो.
“अरे हा जय, वैताग आणलाय त्याने! परवा आम्ही एका पार्टीला गेलो होतो. साहेब ड्रग्स घेऊन आले होते. असा झाडलाय मी त्याला! तेव्हापासून मी बोलणं बंद केलय त्याच्याशी!” कालिंदी.

तुम्हाला सांगतो, माझ्या मनात आनंद आणि दु:खाच्या भावना एकदमच उचंबळून आल्या. आनंद अशासाठी की आपल्या मुलांचे पाय अजूनही जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत, पण दु:ख अशाकरता की वाईट संगतीचा परिणाम होण्याएव्हढी कदाचित व्हल्नरेबल पण असू शकतात ही मुलं!

“तू एक काम कर, त्याला मी बोलावले आहे म्हणून सांग. मी बोलेन त्याच्याशी.” मी कालिंदीला म्हटले. तिच्या चेहऱ्यावरचा रिलीफ बघण्यासारखा होता.

दोन दिवसांनी कालिंदी आणि जय माझ्या ऑफिसात हजर झाले. जय मध्ये एकच फरक पडला होता. केसांचे टोपले जाऊन त्याजागी पोनीटेल आली होती.
“हाय अंकल!” समोरच्या खुर्चीत बसत जयने मला हाय केले. कालिंदी माझ्या रुममध्ये फिरून सर्व वस्तूंच्या जागा बदलण्याचा प्रयत्न करत होती.
“मला कालिंदीने सर्व स्टोरी सांगितली आहे. कधीपासून ड्रग्स वापरायाला लागला आहेस तू?” मी सरळ विषयाला हात घातला.
“नो अंकल, इट वॅाज द फर्स्ट टाईम! आणि मी मिस्टेक केली. खरं सांगतो. नेव्हर अगेन! आय प्रॅामिस! हेच मी कल्लूला दोन दिवस सांगतो आहे. बट शी वोन्ट लिसन!”.

मला कुठेतरी जय खरं सांगतोय हे जाणवत होतं. मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास सोडला.

“काय घेणार? कोल्ड ड्रिंक?” मी.
“कोक चालेल.” जय म्हणाला.
मी ऑफिस किचनमधून तीन कोक मागवले आणि कालिंदीला हाक मारली. जरा घुश्यातच बाईसाहेब येऊन बसल्या.
“हे बघ,” मी कालिंदीला म्हटले, “जयने आपली चूक मान्य केली आहे आणि परत करणार नाही असे मला प्रॅामिस केले आहे. अँड आय बिलिव्ह हिम!”.
“आता तुम्ही म्हणता आहात म्हणून ठीक आहे पण हा नालायक काहीही करेल.” कालिंदी.
“व्हॅाट डू यू मीन? मी अंकलना प्रॅामिस दिले आहे. नो वे मी ते मोडेन!” जय वैतागून म्हणाला.
“ठीक आहे, बघूया.” कालिंदी जरा नाईलाजानेच म्हणाली.

परंतु या सर्व प्रकारानंतर माझं जय बद्धलचे मत जरा चांगले झाले होते. मुलगा खूप हुशार होता. कालिंदीचा चांगला मित्र होता. आणि आय वॅाज हॅपी अबाउट इट!

झालेला सर्व प्रकार अर्थातच मी आदितीला सांगितला. नो सीक्रेट्स बीटवीन नवरा बायको! तिचं मत देखील माझ्या सारखेच होते.

Comments

बापरे भलतंच स्वातंत्र्य दिलंय मुलांना.फार मोकळं वातावरण सुद्धा बरं नव्हे.

By : Pratibha Tarabadkar
18/05/2023 10 : 38 : 48 AM

पण हल्ली असच घडतंय

By : Admin
18/05/2023 6 : 19 : 46 PM

Good one !!!

By : Aniruddha Patwardhan
18/05/2023 11 : 06 : 10 AM

खूप छान लिहिता तुम्ही, आता बऱ्याच घरातून असेच चालू असावे असे वाटते मला.

By : Pratibha Sumant
18/05/2023 5 : 42 : 10 PM

खर आहे

By : Admin
18/05/2023 6 : 19 : 02 PM

सद्य परिस्थितीच वर्णन हुबेहूब मांडलं आहे

By : दीपक टिकेकर
18/05/2023 10 : 29 : 37 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article