माझा स्तंभ-३


वर्तमानपत्र वाचण्याची सवय मला लहानपणापासूनच होती. सुरवातीला आमच्याकडे मराठा वृतपत्र यायचे. आचार्य अत्रे त्याचे संपादक होते. हा माणूस कोणाचीही तमा न बाळगता लिहिणारा होता. त्यांचे संपादकीय नेहमीच वाचनीय होते. मराठ्याला क्रीडा क्षेत्राशी काही देणे घेणे नव्हते. खेळाविषयक बातम्या वाचायला मग मी शेजारी सोनटक्के काकांचा महाराष्ट्र टाइम्स वाचत असे. हे सरकार धार्जिणे वृतपत्र होते. पत्र नव्हे, मित्र अशी त्याची घोषणा असायची. शिरीष कणेकर त्याला पत्र नव्हे, भित्रं, म्हणायचे.

इंग्रजी वाचायला लागल्यानंतर मी टाइम्स ऑफ इंडिया वाचायला लागलो. मटा आणि टाइम्स अजूनही माझ्याकडे येतात. शनिवार रविवारी लोकसत्ता येतो. त्यात कुबेर आपली “संपदा” लुटत असतात. माणूस तसा चांगला आहे पण मधेच त्याच्या अंगात येते हे मात्र खरे! मध्ये काही दिवस इंडियन एक्सप्रेस वाचायचा प्रयत्न केला, पण त्यात काही मजा नाही. काही वर्ष मी इंडिया टुडे नावाचे मासिक वाचत होतो. महिन्याचा पूर्ण आढावा त्यात अतिशय छान पद्धतीने येत असे. पण आता ते वाचनही बंद झाले.

मिड-डे आणि मुंबई मिरर काही दिवस चालले मग बंद झाले. मराठी संध्याकाळ हे एक अजब वृत्तपत्र होते. यात फक्त खून मारामाऱ्या याच्याच बातम्या असायच्या. यावर माझ्या एका मित्राने केलेली टिप्पणी खास होती. तो म्हणाला एक दिवस संध्याकाळ मध्ये बातमी येईल, एकमेकांचा खून करून दोघेही पसार! आता बोला!!

मी सामना वाचायच्या फंदात पडत नाही. सर्व मराठी टीव्ही वाहिन्या रोज सामना वाचून दाखवतात, मग उगाच पैसे का घालवा?

आता काळ बदलला आहे. अनेक लोकांनी वृत्तपत्र वाचणे बंद केले आहे. मी अजूनही वाचतो. फक्त जाहिराती मधून बातम्या शोधणे अवघड जाते. रद्धीमध्ये चांगले पैसे मिळतात.

सध्या कोण प्रेग्नंट आहे, कोण कुणाबरोबर राहतय, कोण कुणाचा मुलगा आहे, वगैरे गोष्टींची माहिती हवी असेल तर बॉम्बे टाइम्स वाचावा. शिवाय मूळव्याध होऊ नये म्हणून सात उपाय, फ्लर्ट कसे करावे, एक्सला परत कसे पटवावे, कुठल्या महाग रेस्टॉरंट मद्धे जाण्याची आपली ऐपत नाही वगैरे गोष्टींसाठी हा पेपर जरूर वाचावा.

काहीही असो, सकाळी दरवाजा उघडल्यावर वर्तमानपत्र समोर दिसले नाही तर चैन पडत नाही हे मात्र खरे!!

Comments

आणी राशी भविष्य, शब्दकोडे, सुडोकू, कार्टून इत्यादी इत्यादी पण वाचनीय असते. बातम्या व अग्रलेख सोडून इतर सर्व काही!

By : Bhalchandra Shrikhande
15/10/2023 11 : 34 : 34 AM

आम्हाला सुद्धा सकाळी पेपर वाचला नाही तर चुकचुकल्यासारखे होते.अर्थात रोज वाचायचा आणि म्हणायचं,ह्यॅ काही अर्थ नाही राहिला पेपर वाचण्यात! मी सुद्धा रोज बॉंबे टाईम्स वाचते.जनरल नॉलेज वाढवण्यासाठी.तू म्हणतोस तसे.आपण ज्ञानपिपासू लोक.ते वाचल्याने ज्ञानवंत होतो हे मात्र शंभर टक्के खरं. मज्जा आली वाचताना.आपल्यासारखे ज्ञानीजन या जगात आहेत हे वाचून मन कसं भरुन आलं.

By : Pratibha Tarabadkar
15/10/2023 11 : 45 : 07 AM

Vataman patra darat pahile ki bara vat ta he matra khara

By : Mona
15/10/2023 3 : 03 : 00 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article