कहाणी नपूर्दप देशाची
कहाणी नपूर्दप देशाची
शशांक पुरंदरे
वेळ: येऊ घातलेली. सकाळचे साडेआठ वाजले होते. मी ऑफिसला जाण्याच्या घाईत होतो. आणि माझ्या खोलीत संकेतचे आगमन झाले. हा नक्कीच शुभसंकेत नव्हता. साहेब आत्ताच फिजिक्स मध्ये पोस्ट ग्रॅजूएट झाले होते आणि उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा खर्चिक विचार त्याच्या डोक्यात घोळत होता.
“बाबा, मला महत्वाचे बोलायचे आहे तुमच्याशी.”
“संध्याकाळी सात वाजता भेट.” मी एक मोजा पायात चढवत म्हणालो.
“मी तेव्हा कट्ट्यावर असतो.”
“तिथे बसुया.”
“बाबा-.” हा कट्ट्यावर बसून काय करतो हे मला माहित होते.
“रात्री जेवण झाल्यावर बोलू.” दोन्ही मोजे घालून मी जोड्यांमध्ये पाय घातले. मान डोलावून संकेत निघून गेला.
“बोला.” जेवून हात धुवून सुपारी खाताखाता मी संकेताला म्हणालो.
“मला तुच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे.”
“तू आधी मराठीत प्राथमिक शिक्षण घे. त्याला उच्च शिक्षण म्हणतात.”
“मला माहिती आहे. पण जिथे मी जाणार आहे तिथल्या भाषेत उ वर्ज्य आहे.”
“ऑ! असा हा कुठला देश आहे?”
“बसा. सांगतो.” मी कुतूहलाने संकेतकडे पाहिले पण स्वारी गंभीर वाटत होती.
“ही साल १९०० ची गोष्ट आहे. Ramservant नावाचे जहाज पॅसिफिक महासागरातून अमेरिकेतील सॅन्फ्रान्सिस्कोकडे जायला निघाले होते. त्यात शंभरएक प्रवासी होते. वादळात सापडून ते बुडाले. परंतु त्यातील सर्व प्रवासी बचावले आणि एका निर्जंतुक बेटावर पोहोचले.”
“तुला निर्मनुष्य म्हणायचे आहे का?”
“त्यांच्या भाषेत माणसाला जंतू म्हणतात.”
“मग जंतूला काय माणूस म्हणतात की काय?”
“बाब मधेमधे बोलू नका. हे सर्व जण भारतीय होते. त्यात पंजाबी, बंगाली, मराठी, दक्षिण भारतीय, गुजराती अशा सर्व लोकांचा समावेश होता. आणि मुख्य म्हणजे ही पन्नास कपल्स होती.
“या बेटाचा परीघ साधारण २५० मैल होता. हे सर्व लोक तिथे राहू लागले. त्यांनी एक नाव तयार केली आणि काही प्रतिनिधी अमेरिकेला गेले आणि अमेरिकेची मदत मागितली. त्यावेळेची अमेरिका आत्तासारखी नव्हती. लवकरच त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले. लवकरच या लोकांनी या प्रदेशाची एक देश म्हणून घोषणा केली आणि अमेरिकेने लगेच त्याला मान्यता दिली. देशाचे नागरिक भारताच्या चारी भागातून आले होते. त्याची आठवण म्हणून उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम यातील पहिली अक्षरे घेऊन नपूर्दप असे नाव ठेवले. उ वर्ज्य असल्यामुळे त्याच्या जागी north मधला न निवडला.”
“तिथे केसात उवा झाल्या तर फक्त ‘वा!’ म्हणतात कारे?”
“बाबा, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय आणि तुम्ही विनोद कसले करताय? गेल्या एकाशेवीस वर्षात नपूर्दपने खूप प्रगती केली आहे. सध्या त्यांची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्ती आहे. त्यांची वीज समुद्रातून येते.”
“समुद्रातून?”
“हो, म्हणजे अमेरिकेने समुद्रातून एक केबल टाकली आहे. वीज, टेलीफोन, इंटरनेट या सेवा त्यातून उपलब्ध होतात. त्यांचे लुला विद्यापीठ जगातील पहिल्या पन्नास विद्यापीठांपैकी एक आहे. म्हणून मी तिथे पीएचडी करायचे ठरवले आहे. प्रोफेसर निजलिंगप्पा देशपांडे माझे गाईड असतील.”
“दोन गाईड कशाला?"
“निजलिंगप्पा देशपांडे हा एकच जंतू आहे! Quantum Theory मधे authority आहेत.”
“ते ठीक आहे, पण पैशाचे काय?”
“त्यांचे चलन आणि आपले चलन सारखेच आहे. ते त्याला रपया म्हणतात. तुम्हाला फक्त माझ्या तिकिटाचा खर्च करावा लागेल, पंचवीस हजार रपया.”
“फक्त?”
“हो, कारण मी बोटीने जाणार आहे. ही बोट रण वरून सुटते.”
“अरे पण रण कच्छमध्ये आहे. ते वाळवंट आहे. तिथे बोट कशी येईल?”
“बाबा, रण म्हणजे उरण. उ वर्ज्य आहे. मी आणि सायली एकदा बाईक वरून रणला गेलो होतो तेव्हा मला ही माहिती समजली. Ramservant ही बोट १९०० साली रण वरूनच निघाली होती. तेव्हापासून हा रूट वापरला जातो. नपूर्दपची embasy रण इथेच आहे.”
“ही सायली म्हणजे तुझी चालू मैत्रीण ना?”
“बाबा चालू काय म्हणताय?”
“अरे, म्हणजे current! बरं, तुझ्या पीएचडी चा विषय काय आहे?”
“Practical application of Quantum Mechanics in love in long distance live-in relationship.”
“अरे पण long distance relationship मधे live-in कसे येईल?”
“बाबा, तुम्ही कमाल आहात. हे माझ्या लक्षातच आले नाही. Ok, Practical application of Quantum Mechanics in love in long distance relationship?”
“Perfect! काही झाले तरी बाप आहे मी तुझा!”
“मी प्रोफेसर निजलिंगप्पा देशपांडेना कळवून टाकतो.”
“थांब. घाई करू नकोस. मला अजून काही प्रश्न आहेत. पीएचडी मध्ये पाच वर्ष तरी जातील. पुढे काय?”
“मला लुला मध्ये प्रोफेसरशिप मिळेल.”
“तू तिथेच स्थाईक होणार का?”
“ते पुढे बघू. सायलीला काही इश्यू नाही.”
“म्हणजे थोडक्यात तुझी सर्व फिल्डिंग लावून झालेली आहे. पण तुझी फी, राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय, त्याचे काय?”
“ते माझ्या फेलोशिप मधे होऊन जाईल. लुलाची स्वत:ची शंभर मजली इमारत आहे. तिथे माझी राहण्याची सोय होईल. आणि खाण्याचे म्हणाल तर सर्व भारतीय पदार्थ तिथे बनतात, कारण सर्व नागरिक मूळचे भारतीय आहेत. इडली-डोसा, वडापाव, बिर्याणी, राजमा चावल, छोले भटुरे, लस्सी, फाफडा जिलेबी, खमण, धियो, बंगाली स्वीट्स, काय हवे ते मिळते.”
“पण हा सगळा माल येतो कुठून?”
“आधी रण मधून जात होता बोटीने. आता दर आठवड्याला एक शिपिंग कंटेनर गोव्याहून जातो. शिवाय अमेरिकेहून माल येतो. आणि भाज्या दूध वगैरे बेसिक गोष्टी तिथे बनतातच.
“तुम्ही मधून कधीतरी आलात तर तुमची सर्व सोय तिथे होईल. Experiment साठी सायली दोन महिन्यातून एकदा तिथे येईलच.”
“आपल्या मातोश्रीना विचारा एकदा!”
“तिला तर केव्हाच सांगितले आहे मी!” आता बोला, बाप कोण आहे?
संकेतने रात्री प्रोफेसरना इमेल पाठवली. लगेच त्यांचे उत्तर आले. त्यात Yae Nakko, असे लिहिले होते. ते वाचून संकेत नाचायला लागला.
मी म्हटले, “अरे नाचतोस काय? त्यांनी येऊ नकोस असे लिहिले आहे,”
“अहो बाबा, Yae Nakko, म्हणजे नक्की ये. N Nakka म्हणजे येऊ नकोस असे असते.”
“ही कुठली भाषा?”
“ही बिभाशा आहे. सर्व भारतीय भाषांचे मिश्रण आहे. हळूहळू कळेल तुम्हाला. चला, Am Saylik udikto.”
मला कळले काहीच नव्हते, तरी मी अंदाजाने म्हटले, हो कळवून टाक!!!



Comments
Interesting story. Enjoyed reading it
By : Vaijayanti Palkar
वाहवा! झक्कास कल्पना आणि छान विनोदी मांडणी! मला वाटतं की तू ह्या गोष्टीची दीर्घ कथा करावी. याचेच पुढचे भाग लिहिले तर आणखी मजा येईल!
By : Bhalchandra Shrikhande
Superb fantasy and imagination. Hats off
By : Deepak Tikekar
गंमतीशीर गोष्ट
By : Pratibha Tarabadkar
Simply great 👍
By : Hemant Kashikar
Innovatively brilliant and refreshing!
By : Swati Marathe
🤣🤣🤣 गंमतशीर गोष्ट. त्तरार्ध पण लिहा. मजा येईल शब्दांची लथापालथच आहे ही तर🤣🤣🤣💖💖
By : अनुज्ञा
तथास्त!
By : Admin
Dr. Good story.
By : Kanhaiya
मस्त मजेशीर कल्पना आणि गोष्टी रुपात केली त्तम मांडणी. याचा त्तरार्ध वाचायला आवडेल.(उ कसा लिहिणार)?😊
By : योगिनी लोथे.
खूप सुंदर कल्पना. सध्याच्या तरुण पिढीच्या भराऱ्या!
By : हेमा रत्नपारखी
मस्त गोष्ट. हटके...कुठेतरी परग्रहावर चेच ठिकाण वाटते आहे. नेहमी सारखेच खुसखुशीत लिखाण.
By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी