वाटः एक पाहणे
वाटः एक पाहणे
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा लाल डब्याची एसटी एव्हढे दोनच पर्याय उपलब्ध होते. मी सायन हॅास्पिटलच्या समोरच्या एसटी स्टॅंडवर साताऱ्याला जाणाऱ्या बसची वाट पहात होतो. अर्धा तास होऊन गेला तरी बसचा पत्ता नव्हता. सातारा सोडून इतर सर्व गाड्या येऊन जात होत्या. बरं, त्यावेळी बसवर धड पाट्याही नसायच्या तेव्हा एखादी बस आली की धावत जाऊन कंडक्टरला त्या प्रचंड गर्दीत कुठली बस आहे ते विचारण्याशिवाय पर्याय नव्हता.
शेवटी वाट पाहून कंटाळून मी कंट्रोलरच्या केबिन मधे जाऊन विचारले,
“सातारा बस इतकी लेट आहे का?”
“इतकी म्हणजे??”
“अर्धा तास होऊन गेला.”
“एसटीच्या संदर्भात अर्धा तास हा उशीर म्हणून गणला जात नाही.” आता यावर मी काय बोलणार होतो?
मुंबईकरांचे आयुष्य हाताच्या घड्याळाला बांधलेले असते. ७.५९ ची लोकल चुकली तर पुढच्या लोकलमधे चढता येणार नाही हे त्याला पक्के माहित असते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीकरता वाट पाहणे त्याला पसंत नाही.
काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने प्लॅटफॅार्म्स वर इंडिकेटर लावले होते ज्यात पुढील लोकल किती वेळाने येईल ते दाखवले जायचे. हे इंडिकेटर्स पाच चार तीन दोन एक असे प्रत्येक मिनिटांनी कमी होत जात पण गंमत म्हणजे पुढील काही मिनिटे ते एकवरच अडकून राहायचे आणि बिचारे प्रवासी चातकासारखी गाडी कधी येणार त्याची वाट पहात ताटकळत उभे रहायचे. सध्या त्यांचे (म्हणजे इंडिकेटर्सचे) काय झाले त्याची मला कल्पना नाही, कारण निवृत्तीनंतर मला रेल्वेने प्रवास करायची वेळ आलेली नाही.
चातक हा पक्षी होता म्हणे! तो कायम पावसाची वाट पहायचा. पूर्वीच्या नाटकांत प्रियकर प्रेयसी चातकाप्रमाणे एकमेकांची वाट पहात असत, असे उल्लेख असायचे. हा पक्षी जर कोणी प्रत्यक्ष बघितला असेल तर मला लगेच कळवा. मला जाम उत्सुकता आहे त्याला पहायची!
हे वाट पाहणे किती त्रासदायक असते याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रत्यय आला असेल. बस स्टॅापवर बसची वाट पाहणे तर सर्वांनीच अनुभवले असेल, जेन झी सोडून! ते बिचारे जन्मापासूनच तीर्थरुपांच्या गाडीने फिरतात. पण आपण बससाठी वाट पहात थांबतो आणि तेव्हढ्या वेळात विरुद्ध दिशेने चारपाच बसेस जातात, हा नित्याचा अनुभव आहे. रिकाम्या रिक्षा येत नाहीत आणि आल्यातर तुम्हाला ठेंगा दाखवून जातात.
मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणे मित्राला फोन केल्यावर पांचच मिनिटांत फोन करतो असे म्हणून तो फोन बंद करतो. नंतर पांच दिवस आपण वाट पहात राहतो. असे म्हणतात की ब्रह्मदेवाच्या घड्याळात एक सेकंद म्हणजे एक युग असते. हे मित्र कुठल्या देवाचे घड्याळ वापरतात देव जाणे! हीच गोष्ट रिलेटिव्हज म्हणजे नातेवाईकांना देखील लागू पडते. हे ओळखूनच बहुतेक आईन्स्टाईनने सापेक्षतावाद म्हणजे रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला असावा, म्हणजे काय की टाईम इज रिलेटिव्ह! तुमच्या आणि माझ्या वेळेत काही साधर्म्य नाही.
पण मुंबईकर बरे! त्यांना वेळेचे महत्व माहित आहे, पण पुणेकर??!। ढोबळ मानाने मुंबईकर वेळ मिनिटाच्या हिशोबाने मोजत असतील तर इतर”कर” ती साधारण अर्ध्या तासाच्या अंतरात मोजतात.
एखाद्याला नाक्यावर भेटायला बोलवावे. दहा पंधरा मिनिटे वाट पाहून फोन केला तर आधी फोन उचलणार नाही. उचललाच तर कुठे आहेस असे विचारल्यावर हा काय, कोपऱ्यावरच आहे असे उत्तर मिळते. पण त्याचा कोपरा आणि तुमचा कोपरा या दोन वेगळ्या गोष्टी असतात. तुमचा फोन गेल्यावर साहेब पॅंट चढवून पट्टा शोधायला लागतात. कुठेही वेळेवर पोहोचणे यांच्या रक्तातच नाही.
आजकाल आपल्या सर्वांच्या घरी टीव्ही, फ्रिज, वॅशिंग मशीन वगैरे अनेक उपकरणे असतात. ही नेहमी बिघडत असतात. आता प्रत्येक कंपन्यांचे टोल फ्री नंबर असतात. तो लावल्यावर वेलकमची टेप वाजते. नंतर आपण रांगेत आहात असे सांगितले जाते. मग रांगत रांगत ही रांग पुढे सरकत राहते. काही मिनिटे संगीत ऐकल्यावर याचा प्रतिनिधी फोनवर येतो. तो तुम्हाला तुमची आणि मशिनची जन्मकुंडली विचारतो. ही शोधण्यात काही मिनिटे खर्ची पडतात. १-८६० ने सुरु होणारे नंबर टोल फ्री नसतात. त्यामुळे तुमचे फोन बिल वाढत राहते. शेवटी तक्रार दाखल झाल्यावर पुढील २४ ते ४८ तासांत त्यांचा टेक्निशियन तुमच्याशी संपर्क करेल असे सांगितले जाते. जर तुम्ही नशीबवान असाल तर एक दोन तासांत त्या दिशेची घंटा वाजते. मग अजून काही तास वाट पाहिल्यावर टेक्निशियन उगवतो. अशी ही घाम फोडणारी प्रक्रिया तुमचा एसी ऐन उन्हाळ्यात बंद पडला असेल तर तुमची पूर्ण “वाट” लावते.
तुमचे लोकल प्लंबर, इलेक्ट्रिशन यांची कथा देखील अशीच आहे. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा हे लोकं गावाला गेलेले असतात. गावात असले तर अर्ध्या तासांत येतो म्हणून दिवसभर वाट पहायला लावतात. प्रत्येक फोनला हा निघालोच आहे असे उत्तर मिळते.
घरात रिनोव्हेशन किंवा पेंटिंग करणे हा विचारच छातीत धडकी भरवतो. काम वेळेवर सुरु करुन मधेच गायब होणे ही सामान्य घटना आहे. घरात धुळीचे साम्राज्य असते, सर्वत्र सामान पसरलेले असते. वस्तु तुटणे, हरवणे हे नेहमीच होते. कामगार आले तरी दुपारी तुमच्याच घरात पथारी पसरून चक्क झोपा काढून आपली झोप उडवतात. काम वेळेत आणि दिलेल्या बजेटमधे कधीच पूर्ण होत नाही. काम कधी पूर्ण होणार याची वाट पहात राहण्याशिवाय आपल्या हातात काहीच रहात नाही. शेवटी काम मनासारखे होत नाही ते वेगळेच!!
घरी येणारा दूधवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला, कामवाली बाई हे तर आपले नेहमीचे “वाट”सरु आहेत. कधीकाळी उगवणारे नातेवाईक देखील याच पंथातले आहेत. “बसायला” येणारे मित्र मात्र नेहमी वेळेआधीच येतात.
महिनाअखेरी होणार पगार अथवा पेन्शन, बॅंकेचे व्याज, वटणारे चेकस या देखील वाट पहायला लावणाऱ्या घटना आहेत.
डॅाक्टरच्या केबिन बाहेर आपला नंबर कधी येईल याची वाट पहात मी आयुष्यातील अनेक तास खर्च केले आहेत.
मुलामुलींच्या लग्नाची वाट पाहणारे पालक हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
आपली एकंदरीतच “वाट” लावणारे असे अनेक अनुभव गाठीशी बांधत आयुष्यात वाट काढत राहण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.
तळटीपः शेवटची बातमी हाती येईपर्यंत भारताचे पुरुष व महिला क्रिकेट संघ आशिया चषक जिंकूनही करंडक हाती येण्याची वाट पहात आहेत.
अर्थात सर्व जग ज्याची खरोखरच चातकासारखी वाट पहात आहे, ज्याने पूर्ण जगाची वाट लावली आहे, ते म्हणजे इराण अमेरिका युद्ध थांबण्याची ……पण
ही वाट दूर जाते !!!!
आणि हो, मोदी साहेब जरा बघा काहीतरी जमतंय का, पंधरा लाख अकाऊंट मधे येण्याची वाट पाहून थकायला झालंय ! तो ट्रंप देखील पाच हजार डॅालर देणार आहे म्हणे!



Comments