हवामानाचा अंदाज
जून महिना जवळ आला की आपल्या सर्वांना पावसाचे वेध लागतात आणि मग सर्वांचे लक्ष वेधशाळेकडे जाते. कारण नक्की पाउस कधी सुरु होईल याचा (अ)चूक अंदाज फक्त वेधशाळाच सांगू शकते. यंदादेखील पाउस जूनच्या आधीच सुरु होईल असा अंदाज असताना प्रत्यक्षात मात्र जुलै मध्येच खऱ्या पावसाला सुरुवात झाली. आता कालदेखील मुसळधार पावसाचा अंदाज होता पण प्रत्यक्षात मात्र पाउस मिळमिळीतच झाला हे असे का होते हे समजून घेण्यासाठी आम्ही प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री स. दा. पावशे यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर झालेल्या बातचीतेचा काही भाग आपल्यासाठी आम्ही प्रस्तुत करत आहोत.
आम्ही: नमस्कार. मी आमच्या whatsapp ग्रुप तर्फे आपली मुलाखत घ्यायला आलो आहे. आमच्या सर्व सभासदांना उत्सुकता आहे की हवामानाचे अंदाज कसे वर्तवले जातात. तर याबद्धल काही उपयुक्त माहिती आपण द्याल अशी आम्हाला आशा आहे.
स. दा. पावशे: हो, का नाही. नक्कीच!
आम्ही: आपण या क्षेत्रात बरेच वर्ष काम करत आहात. त्याबद्धल काही माहिती द्याल तर बरे होईल.
स. दा. पावशे: मी शाळेत असल्यापासूनच मला हवामानाच्या अंदाजाबद्धल कुतूहल होते. मला आठवते तेव्हापासूनच अगदी गुरुजी वर्गात शिरले की त्यांचा चेहरा पाहून मला आज वर्गाचे तापमान किती अंशांनी वर जाणार आहे याचा अंदाज येत असे. गुरुजी शिकवत असताना मी मात्र खिडकीबाहेरील ढग बघत बसे. त्यावरून मी कायम बाहेरच्या मुलींकडे बघतो असा गुरुजींचा समज झाला. मी त्याबद्धल छडीने नेहमीच मार खाल्ला आहे. पण तेव्हाही ढग पाहून पाउस कधी पडेल याचा अचूक अंदाज मी बांधत असे. मजल दरमजल करत यथावकाश पदवी प्राप्त करून मी हवामान खात्यात लागलो ते आतापर्यंत इथेच आहे.
आम्ही: तुम्ही हवामानखात्यात लागल्यापासून आत्तापर्यंत खूप बदल आपण पाहिले असतील, नाही?
स. दा. पावशे: हो तर, पूर्वी फार कमी लोकांना या खात्याबध्दल माहिती होती. आता उलट झाले आहे. आता अनेक नवीन तरुणी, माफ करा, मला तरुणवर्ग म्हणायचे होते, या विषयाकडे आकर्षित होऊ लागला आहे. शिवाय हल्ली पगारदेखील चांगले मिळतात.
आम्ही: माफ करा, पण मी त्याबध्दल बोलत नव्हतो. मी हवामानशास्त्र, हवामानाचे अंदाज, नवीन तंत्रज्ञान याविषयी विचारात होतो.
स. दा. पावशे: हो हो, नक्कीच. हल्ली उपग्रह, इंटरनेट वगैरेमुळे हवामानशास्त्र खूप विकसित झाले आहे. परंतु त्यामानाने आपल्या देशात अजून विकास झाला नाही आहे.
आम्ही: पण पंतप्रधान तर विकास होणार असे म्हणत आहेत.
स. दा. पावशे: हो, पण अजून नाही झालाय.
आम्ही: जरा विस्तृतपणे सांगाल का?
स. दा. पावशे: सध्या हवामानाचा अंदाज देण्यामध्ये CNN, BBC या वृत्तवाहिन्या अग्रेसर आहेत. Weather.com सर्वात विश्वासार्ह इंटरनेट संस्था आहे. आम्ही या संस्था चोवीस तास पहात असतो. उष्ण वारे मध्यपूर्वेतून, थंड वारे हिमालयावरून येतात. म्हणून आम्ही, मध्यपूर्व, पाकिस्तान, नेपाळ, रशिया यांच्या वाहिन्या सतत पहात असतो. त्यांनी अंदाज वर्तवले की आम्ही लगेच तेच अंदाज आपली वाहिन्यांना पाठवतो. त्यामुळे चुका होत नाहीत. पण सध्या काय झालंय, कोरोनामुळे या सर्व देशांची हलाखीची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांचे आणि परिणामी आमचे अंदाज चुकत चालले आहेत.
आता नैॠत्य मौसमी पावसाचेच पहा ना. अंदमानमध्ये मान्सून आला की दोन दिवसांनी श्रीलंकेत आणि मग केरळमध्ये येतो. त्यामुळे अंदमानमध्ये आल्यावर दोन दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असे आम्ही जाहीर केले. पण तो श्रीलंकेत पोचायलाच चार दिवस लागले. आर्थिक आणीबाणी असल्यामुळे श्रीलंकेतून माहिती उपलब्ध झाली नाही. मग अंदाज चुकला.
स. दा. पावशे: आम्ही: पण आपलेदेखील उपग्रह आहेत ना? त्यांच काय?
उपग्रह आहेत, पण कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे प्रॅाब्लेम झाला आहे.
आम्ही: पावशे साहेब, उपग्रहाचा आणि कोळश्याचा काय संबंध?
स. दा. पावशे: अहो, कोळसा नाही, म्हणून वीज नाही, म्हणून data येत नाही, मग अंदाज कसा लावणार?
आम्ही: म्हणजे एकूण या पावसाळ्यात आपले काही खरे नाही. बर, आपण आता मुंबई-ठाण्यापुरते बोलूया. लोकल अंदाज तुम्ही कसे लावता?
स. दा. पावशे: मी जी सिस्टीम तयार केली आहे त्याबद्धल सांगतो. मी चोवीस तरुण-तरुणींना शिकवून तयार केले आहे. हे सर्व जण मुंबई-ठाण्यात चोवीस महत्वाच्या ठिकाणी, जसे की, हिंदमाता, शीव, चेंबूर, जोगेश्वरी वगैरे, वगैरे, दिवसरात्र काम करत असतात. त्यांचे काम एकच! ढगांकडे पहात बसणे. मी जसा शाळेत असताना ढगांकडे बघून पावसाचा अंदाज बांधायचो, तेच टेकनिक मी यांना शिकवले आहे. पुढील एक तासात पाउस पडेल की नाही याचा अचूक अंदाज ते मला कळवतात. एव्हढेच नव्हे तर ढगांच्या रंगावरून आणि दाटी वरून किती मिमी पाऊस पडेल हे देखील सांगतात.
आम्ही: किती पाऊस पडला हे कसे मोजतात?
स. दा. पावशे: या सर्वाना एक भांडे आणि फुटपट्टी दिली आहे मोजायला.
आम्ही: पण याने किती अचुक मोजणी होते?
बऱ्यापैकी. आता कसे आहे, फुटाला बारा इंचाचा फरक तर पडूच शकतो. शेवटी माणूस आहे.
आम्ही: पण तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान का वापरत नाही?
स. दा. पावशे: पैसा. सर्व कर्मचार्यांचे पगार दिल्यावर पैसेच उरत नाही. अंधेरी विभागासाठी एक नवीन तंत्र विकसित केले आहे. अंधेरी सबवेमध्ये एक माणूस ठेवला आहे. सबवे मध्ये पाणी भरू लागले की मुसळधार पावसाचा अंदाज दिला जातो. सबवे कडे येणारी वाहतूक वाढली की पाउस कमी झाला आहे हे समजते. सायनला गांधीमार्केट येथे देखील असेच काम करायची योजना आहे.
आम्ही: पण मग शेवटी तुम्ही ही अशी थुकपट्टीची, माफ करा, फुटपट्टीची कामे करता आहात ती अजून किती काळ चालणार?
आता असे आहे, आपल्या खात्यात पंधरा पंधरा लाख येणार होते, ते आले का? मेट्रो २०१९ मध्ये चालू होणार होती ती झाली का? मी पुन्हा येणार म्हणणारे अजून अर्ध्या वाटेवरच आहेत. एखादी योजना सरकार पाच वर्षात पूर्ण करते. तुम्ही अडीच वर्षात सरकार पाडलं तर कामे अर्धीच होणार ना? या कामाचे तसेच आहे. एक दिवस नक्की होतील. लोकशाहीवर विश्वास ठेवा.
आम्ही: तुमचे बरोबर आहे. पण प्रॉब्लेम आमचा होतो. ऑफिसला जाताना छत्री न्यायची की नाही तेच समजत नाही. ठीक आहे. आपली बातचीत आज इथेच थांबवू या. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्धल आमच्या ग्रुपतर्फे खूप खूप आभार!
स. दा. पावशेंनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. म्हणाले, जाताना छत्री उघडूनच बाहेर पडा. मुसळधार पाउस येण्याची शक्यता आहे.
बरं झालं पावशे साहेबांचा सल्ला आम्ही ऐकला म्हणून, नाहीतर मुसळधार उन्हाने आम्हाला भाजून काढले असते!



Comments
मनोरंजक!!
By : Vijay
good 1
By : Sunil Moghe
झक्कास विडंबन! सहज जाता जाता विनोद करण्याची शैली मस्त.
By : Bhalchandra Shrikhande
Very funny 🤗
By : Pratibha Tarabadkar