मनोगत बंडूचे


श्री दादासाहेब पाटील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयाचा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरु आहे. स्वत: दादासाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. बंडू उर्फ बळवंत, वय वर्ष नऊ, इयत्ता चौथी, आपले मनोगत सांगायला व्यासपीठावर उभा आहे. समोर सर्व गावातली मंडळी जमली आहेत. विंगेत मंजुळाबाई गणपुले, बंडूच्या वर्गशिक्षिका उभ्या आहेत. बंडू पांढरा सदरा, खाकी अर्धी चड्डी, डोक्यावर गांधी टोपी आणि पायात कॅनव्हास शूज अशा वेषात आहे. त्याच्या हातात चार पाच कागद आहेत ज्यावर त्याचे मनोगत लिहिलेले आहे. बहुतेक आराखडा मंजुळाबाईंचा आहे पण बंडूने त्यात खाडाखोड करून आपले मनोगत देखील घुसडले आहे. बंडू मागे वळून विंगेतल्या मंजुळाबाईंकडे पाहतो आहे. बाई त्याला खुणेनेच सुरुवात करायला सांगतात.

बंडू प्रथम वाकून दादासाहेबांना आणि मग प्रेक्षकांना नमस्कार करतो. तेव्हढ्यात त्याची टोपी खाली पडते. ती खाली वाकून डाव्या हाताने उचलेपर्यंत त्याच्या उजव्या हातातील कागद खाली पडतात आणि पंख्याच्या वाऱ्यामुळे इकडे तिकडे उडतात. कागद उचलण्याच्या प्रयत्नात टोपी परत खाली पडते. शेवटी कागद आणि टोपी उचलल्यावर बंडू अनवधानाने कागद डोक्यावर ठेवायचा प्रयत्न करतो. शेवटी मंजुळाबाई व्यासपिठावर येऊन बंडूला टोपी घालतात आणि कागद त्याच्या हातात कोंबतात. या गडबडीत बाईंच्या हातातील एक कागद बंडूच्या कागदात मिसळतो. एका हाताने टोपी डोक्यावर गच्च पकडून बंडू परत नमस्कार करतो. बंडू मनोगत वाचायला सुरुवात करतो.

“मित्रांनो, आणि (लाजत) मैत्रीणींनो आणि प.प्पू., म्हंजे परमपूज्य दादासाहेब पाटील साहेब आणि मंजुळा टीचर बाई आणि इतरांनो, तुम्हाला सर्वाना पंधरा ऑगस्टच्या प्रजासत्ताक दिनाच्या (मंजुळाबाई विंगेतून मोठ्याने, स्वातंत्र्य दिनाच्या म्हणून ओरडतात) सॉरी, स्वातंत्र्य दिनाचे अभिनंदन! आज आपल्या देशाचा हॅपी बर्थडे आहे. म्हंजे १९४७ साली आपण इंग्लंडला हरवून टेस्ट मॅच जिंकली. तेव्हापासून आपण फक्त आपापसात रणजी सामनेच खेळतोय. आपल्या जिल्ह्यात सध्या प.प्पू. दादासाहेब विनर आहेत.”

थांबून बंडू हातातला कागद वाचतो.
“आपला देश किसानप्रधान देश आहे. किसान म्हणजे शेतकरी. शेतकरी उन्हाळ्यात बी बीयाणे शेतात लावतो. पावसाळ्यात पीक येतं आणि नंतर पूर आल्यावर पीकं वाहून जातात. मग ते कर्जमाफीची मागणी करतात आणि मग सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जुंपते. आपली दादासाहेबांची पतपेढी आहे आणि ते दरवर्षी सर्वाना कर्ज देतात. आपल्या गावात दादासाहेबांची मोठी शेती आहे. त्याला बाराही महिने पीक असते आणि पिकाला पाणीपण मिळते. इतर शेतकऱ्यांची पीकं मात्र कधीतरीच येतात. दादासाहेबांना दरवर्षी पूर्ण कर्जमाफी मिळते. इतरांना मिळतेच असे नाही. असो. मी किसान नाही. आपले आधीचे कॅप्टन एलबीएस रोड, म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान संदेश दिला. मी जवान आहे पण तो जवान नाही. पण त्यांची जय असो. म्हणजे शोले मधला जय नव्हे, तर खरीख्रुरी जय. असो.”

दादासाहेब बाजूला उभ्या असलेल्या सचिवाच्या कानात कुजबुजतात, “ पोरगं हुशार आहे. आत्ताच पक्षात घेऊन टाका.”

बंडू हातातला दुसरा कागद वाचायला घेतो.

“मंजू, कार्यक्रम झाला की शाळेच्या मागे भेट. आपण आईसक्रीम खायला जाऊ.- सुहास.” विंगेत मंजुळाबाई दातओठ खात बंडूला खाणाखुणा करतत. पण बंडूची त्यांच्याकडे पाठ असल्यामुळे त्याचे लक्ष जात नाही.

“सॉरी, चुकून वेगळाच कागद वाचला. म्हंजे दादासाहेबांनी नंतर आईस्क्रीमची सोय केली आहे तरीदेखील सुहास मंजुळाबाईंना स्वत:च्या पैशाने का आईसक्रीम देतोय काय माहित? दादासाहेबांचे आईस्क्रीम खाऊन मग सुहासचे आईस्क्रीम खाईपर्यंत ते वितळणार नाही का? असो.
आपल्या देशात दादासाहेबांसारखे अनेक चोर, सॉरी थोर, नेते होऊन गेले. म्हंजे दादासाहेब आहेत अजून! खरं सांगतो आपण काय कुणाला पहिले नाय. तेव्हा आपले फक्त दादा साहेब. ते म्हणतील तसं करायचं असं मंजुळाबाईंनी आम्हाला शिकवलंय. मंजुळाबाईंची शिकवणी म्हंजे लई भारी. मी तर कायम त्यांच्याकडेच पहात असतो. दादा साहेब रात्र रात्र काम करतात आणि बाई त्यांना साथ देतात. त्यातच आपल्या गावाचं आणि देशाचं भलं आहे. बाई नेहमी वाड्यावरच असतात. दादासाहेब आता लवकरच मोठा आणि नवीन वाडा बांधणार आहेत. असो. आत्ता तो विषय नाही.
दादासाहेबांशिवाय मुख्याध्यापक बोरटाके गुरुजी, नगराध्यक्ष वाटमारे साहेब आणि महिला विंगेच्या प्रमुख सरोज गाढवे यांची पण नावे घे असे बाईनी सांगितले आहे. या सर्वाना माझा सांष्टांग प्रणाम.” असे म्हणून बंडू स्टेजवर आडवा होतो. परत त्याची टोपी पडते आणि कागद इतस्तत: विखुरतात. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर बंडू पुन्हा मनोगत सुरु करतो.

“मी पण मोठेपणी खूप मोठा होणार आहे. पण त्यासाठी खूप खूप अभ्यास करून चौथी पास होणार आहे. नाहीतर घरात घेणार नाही असं म्हणाला आहे माझा बाप! पण माझी मंजुळाबाईंवर निष्ठा (म्हणजे काय??) आहे. त्या मला पास करणार. असो. त्यासाठी अभ्यास करायला हवा. म्हणून माझं मनोगत इथेच संपवतो. नंतर आईस्क्रीम खायला विसरू नका. आणि अजून हवे असेल तर शाळेच्या मागे सुहासला भेटा. जय जवान, जय किसान, जयहिंद, जय आपले गाव कावळे बुद्रुक, जय दादासाहेब आणि जय मंजुळाबाई!”

कार्यक्रम संपल्यावर बाजूला घेऊन मंजुळाबाई बंडूला बडवबडव बडवतात. त्यांनी कुणाचे आईसक्रीम खाल्ले ते मात्र अजून समजलेले नाही.

Comments

“मी पण मोठेपणी खूप मोठा होणार आहे. पण त्यासाठी खूप खूप अभ्यास करून चौथी पास होणार आहे. This is one hilarious line. नंतर आईस्क्रीम खायला विसरू नका. आणि अजून हवे असेल तर शाळेच्या मागे सुहासला भेटा. Suhas tya gavat world famous zhala. Great going. It was fun to read this short comedy.

By : Vivas Bagwe
26/04/2023 7 : 17 : 39 PM

Sahi Manogat. Aaplya group cha ani olkhicha ahe ha Bandu.

By : Sunil Moghe
26/04/2023 7 : 21 : 00 PM

👌भन्नाट !!!👍

By : ऋता कुलकर्णी
26/04/2023 8 : 41 : 28 PM

मजेशीर कल्पना 😄

By : Pratibha Tarabadkar
26/04/2023 8 : 50 : 42 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article