जनरीत


मी कधी फारशी घेत नाही
कारण तशी आमची रीत नाही

पण प्रसंगानुसार
काही सत्रं होतात
आणि असे प्रसंग
वारंवार येत राहातात

कधी मित्र घरी येतात
कधी मित्रांकडे जाणं होतं
मित्रांचं मन मोडणं
बरं नाही वाटत

कधी कुणाच्या मुलाचा
पहिला वाढदिवस असतो
तर कधी कुणाच्या लग्नाचा
पंचविसावा असतो

कधी घरी, बायको
माहेरी जाते म्हणून
तर कधी बाहेर,
बायको परत येते म्हणून

कधी साहेब
आनंद व्यक्त करतो
तर कधीतरी नाईलाजाने
आम्हाला करावा लागतो

कधी सुखाचे प्रसंग येतात
तर कधी दु:ख गिळावं लागतं
धकाधकीच्या जीवनात
आपल्या हातात तरी काय असतं?

आमची रीत नाही तरी
जनरीतीप्रमाणे वागावं लागतं!
मी फारसा पीत नाही
तरी कधीकधी प्यावं लागतं

Comments

वाह वाह, झक्कास! पीनेवालोंको पीनेका बहाना चाहिये! याच विषयावर एक कविता आठवली ... प्रत्येक पार्टीत एक क्वार्टर कमी पडते ...

By : Bhalchandra Shrikhande
24/04/2023 9 : 33 : 53 PM

पीनेवालोंको पीनेका बहाना चाहिए

By : प्रतिभा ताराबादकर
24/04/2023 10 : 59 : 41 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article